Sunday, June 21, 2020

संस्कृतीचा व्यथा अभिमान बाळगणाऱ्यांसाठी समर्पित: मनोज खरे

प्रकाश कामत
पणजी:
ट्वीटर समाज माध्यमावर कधीं कधीं असे कांही विचार वाचायला मिळतात कि ते अन्य लोकांशी जास्तीतजास्त शेअर करण्याचा मोह होतो.
असेच एक अभ्यासक @Manoj2211Khare हे होत.
त्यांचे प्राचीन संस्कृती-संबंधित विचार अंतर्मुख करतात.

खाली त्यांचा एक Twitter thread शब्दानशब्द जरूर वाचवा असाच आहे.
आज जे उथळ 'हिन्दुत्व', "गर्व से कहो " सारखी घोषणाबाजी (राजकीय माळावर) चालते व सहज खपते त्याचाही उलगडा खालील विचार वाचताना होतो:

संस्कृतीचा व्यथा अभिमान बाळगणाऱ्यांसाठी समर्पित:

"सोने की चिडीया" म्हणवला जाणाऱ्या भारतात उत्तरोत्तर काळात अस काय झालं की भारताचं जागतिक प्रभावात योगदान कमी होत गेलं? मुळात भारतीयांना आपले नेमके सामर्थ्य कशात आहे व त्या सामर्थ्याच्या मर्यादा काय आहेत, हेच ओळखता आले नाही.
आपण नेमकं कोणत्या फेऱ्यात अडकलो? त्याचा परिणाम काय झाला? आपली सृजनशीलता,कल्पकता आणि विधायक शक्ती नेमकी कशात खर्च झाली? हे शोधण्याचा आपण कधी प्रयत्न केला का? वेळ सरत गेली तस आपण फक्त संस्कृतीचा गंड कुरवळण्यात धन्यता मानली. याच संस्कृतीमुळे उदयास आलेल्या सामाजिक विषमतेचा आपण कधी समूळ असा अभ्यास केला का? कारण ही संस्कृती दैवी आहे, ईश्वरनिर्मित आहे हे आपल्या मनावर बिंबवलं गेलं. संस्कृतीचे निर्माते त्या त्या भूभागातील मानवी समूह असतात. कोणतीही मनुष्यबाह्य शक्ती संस्कृतीच निर्माण करत नसते, आणि म्हणूनच पृथ्वीवरील विविध भागात तेथील समाजवास्तवातील समस्यांनुसार भिन्न संस्कृत्या उदयास आलेल्या असतात, याचे भान भारतीयांना कधी आलेच नाही. तत्वज्ञान, साहित्य आणि विविध कला म्हणजे संस्कृती असा जावईशोध लावणाऱ्यांना संस्कृतीमध्ये सामाजिक आणि राजकीय बाबींचाही समावेश होतो याचा परस्पर विसर पडलेला दिसतो.
संस्कृतीतील 'माणूस' नावाचा प्राणी, मग तो सामान्य असो अथवा महापूरूष, तो त्याच्या युगाचा अपत्य असतो आणि त्याच्या कर्तृत्वाने तो नव्या युगाची व नव्या संस्कृतीची निर्मिती करत असतो. ह्या थ्रेडला मॅक्समुलरचा म्हणणं आधार म्हणून अगदी समर्पक वाटतो. कधी जमल्यास बघा वाचून.
"A History of Ancient Sanskrit Literature" या ग्रंथात मॅक्सम्युलर म्हणतो, "भारतीयांना राष्ट्रभावना (Feeling of nationality) कधीच माहीत नव्हती. त्यांचे मन राष्ट्रीय भावनेने कधीच उचंबळून आले नव्हते. तिथे कविंना स्फुर्ती देणारे नायकच नव्हते आणि इतिहासकारांना लिहायला इतिहासही नव्हता.
भारतीयांसाठी धर्म आणि तत्वज्ञान यांचेच एकमेव क्षेत्र होते जिथे ते वाङमय निर्मिती आणि पूजेअर्चेचे स्वातंत्र उपभोगू शकत होते. त्याचीच फलोनिष्पत्ती ही की धर्म आणि अध्यात्माच्या भावना भारतीय माणसाच्या मनावर खोलवर रुजल्या आहेत. त्यांचा संघर्ष हा विचारांचा, त्यांचा भूतकाळ हा
निर्मितीच्या समस्येचा आणि भविष्य हा जीवनअस्तित्वाची समस्या होती. भारतीयांना वर्तमान हाच भूत आणि भविष्यकाळ यावर तोडगा असतो हे कधीच उमगलं नाही." यात अजूनही बरच काही म्हटलंय मॅक्समुलरने पण विस्तारभयास्तव ते टाळतो. पण या सगळ्याची परिणीती काय झाली आपणास ठाऊक आहे का?
भारतीय माणसाचे मन वर्तमानकाळावर कधीच खिळले नाही. त्यामुळे त्याला त्याचे सामर्थ्य अन् शक्ती यांचा पुरेपूर उपयोग कधीच करता आला नाही. भारतीय इतिहासाच्या विविध कालखंडात समाजातील वेगवेगळ्या वर्गात, आध्यात्मिक विचारांनी ज्या प्रकारे रूप धारण केले, ते सहाजिकच अंधश्रद्धेपासून भिन्न, परंतु अध्यात्माचे उदात्तीकरण करणारे होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झाला की, जगात भारत सोडून असे एकही राष्ट्र नाही की ज्यात, आत्म्याच्या अंतर्जीवनाने (inward life of the soul) संपूर्ण जनतेच्या बाह्यजीवनातील सर्व क्षेत्रे शोषून घेतलेली आहेत.
याने झालं काय की कोणत्याही राष्ट्राला राष्ट्र म्हणून उभारी देणारे गुणच आपल्याकडून नष्ट केले गेले, आणि पर्यायाने जागतिक प्रभाव उमटवण्यात आपण अयशस्वी ठरलो. ज्यावेळी पर्शियन, रोमन,ग्रीक लोक जागतिक क्षितिजावर चमकत होते आपण degraded circle मध्ये अडकलेलो होतो ज्यामुळे आपण सगळ्यांसाठीच अदृश्य समान होतो. बरेच जण या मतांशी असहमत असतील त्यांनी खुशाल या संदर्भात संहत भाषेत आपली हरकत नोंदवावी, पण जर तटस्थ वृत्तीने विचार केला तर आपल्याला वरील थ्रेडमध्ये तथ्य जाणवेल.

बाकी चुकभुल माफ असावी वाचक रसिक माईबाप. 😊

No comments:

Post a Comment